GRAMIN SEARCH BANNER

मुंबई : दिवाळीच्या रॉकेटमुळे खा. रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग

Gramin Varta
123 Views

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर राहत असलेल्या मुंबईतील उच्चभ्रू इमारतीच्या 22व्या मजल्यावर दिवाळीच्या रॉकेटमुळे आग लागली. दिवाळीच्या रात्री अचानक लागलेली ही आग पाहताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

मात्र, इमारतीच्या फायर सिस्टिममध्येच पाणी नव्हते, हे समोर आल्यानंतर वायकर यांचा संताप अनावर झाला. या घटनेनंतर त्यांनी थेट इमारतीच्या व्यवस्थापनावर तसेच महानगरपालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आग लागल्याचे समजताच रवींद्र वायकर स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच त्यांनी रहिवाशांसोबत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी इमारतीतील फायर सिस्टिममधून पाणीच येत नव्हते. त्यामुळे ते संतापले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर मुंबईतील नव्या इमारतींमध्येच फायर सिस्टिम कोरडी असेल, तर इतर इमारतींचं काय? त्यांनी महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाला आदेश देत म्हटले की, मुंबईतील प्रत्येक इमारतीची फायर सिस्टिम योग्य स्थितीत आहे का, याची तपासणी तात्काळ करण्यात यावी. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि हौसिंग सोसायट्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत मुंबईत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. वायकर यांनी सांगितले की, यंदा रॉकेटमुळे अनेक ठिकाणी इमारतींना आग लागल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घातक फटाक्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभेत या विषयावर मी प्रश्न उपस्थित करणार आहे. रॉकेट फटाके इमारतींच्या परिसरात सोडणे धोकादायक आहे. नागरिकांनी जबाबदारीने दिवाळी साजरी करावी. मुंबईत अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक जणांचा जीव गेला असून, आता कायद्यात सुधारणा आणि नियंत्रण आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

Total Visitor Counter

2685451
Share This Article