गाव विकास समितीचे सुहास खंडागळे व उदय गोताड यांच्याकडून अनोख्या महोत्सवाचे आयोजन
संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीला एक नवी ओळख आणि विकासाची नवी दिशा देण्यासाठी ‘कुणबी महोत्सव’ या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ आणि ७ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील कर्ंबेले तर्फे देवळे येथील गोताडवाडी येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. संस्कृती, कला, क्रीडा आणि स्वाभिमान या चार स्तंभांवर आधारित हा महोत्सव ग्रामीण जीवनातील चैतन्य पुन्हा जागृत करणारा ठरेल असा विश्वास आयोजक सुहास खंडागळे,उदय गोताड यांनी व्यक्त केला आहे.
हा महत्त्वाकांक्षी महोत्सव आयोजित करण्यासाठी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, आणि उपाध्यक्ष मंगेश घावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
दोन दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा श्रीगणेशा चित्रकला स्पर्धा, आकर्षक रांगोळी स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटनाने होईल. सायंकाळी ‘धमाल’ मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले जाईल.
तर, महोत्सवाचा दुसरा दिवस, ७ डिसेंबर, अधिक सांस्कृतिक रंग घेऊन येणार आहे. या दिवशी नृत्य स्पर्धा, कुणबी संस्कृतीचे विशेष प्रदर्शन आणि अस्सल पारंपरिक मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कुणबी समाजाची समृद्ध परंपरा, कला आणि क्रीडा क्षेत्रातील कौशल्ये एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण जीवनाला एक नवी उमेद आणि विकासासाठी एकजूट करण्याचे उद्दिष्ट या महोत्सवाच्या आयोजनामागे आहे, ज्यामुळे संगमेश्वरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्ंबेले येथील गोताडवाडी येथे होणाऱ्या या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.