GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या प्रलंबित नागरी प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक; नगरपरिषद प्रशासनाला दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
33 Views

चिपळूण :  चिपळूण शहरातील प्रलंबित नागरी समस्या, प्रशासनाची ढिलाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जाब विचारला. यापूर्वी २९ एप्रिल २०२६ रोजी शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध गंभीर समस्यांबाबत नगरपरिषदेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र तरीही अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याने आज शिवसैनिकांनी नगरपरिषदेत धडक देत प्रशासकीय कारभाराचा तीव्र शब्दांत पाठपुरावा केला.

या बैठकीत बहादूरशेख नाका टेलिफोन एक्सचेंज ते वांगडे मोहल्ला उर्दू शाळा दरम्यानच्या मंजूर रस्त्याचे काम मुद्दाम अर्धवट ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. या अपूर्ण रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याबद्दल शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, संबंधित रस्त्याच्या मधील रहिवाशांना आतापर्यंत प्रत्येकी दोन नोटिसा देण्यात आल्या असून, आता अंतिम नोटीस बजावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

शहरात महानगर गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांवर उघडे ठेवण्यात आलेले खड्डे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. कंपनीकडून दुरुस्तीसाठी आगाऊ रक्कम भरून घेतली असतानाही नगरपरिषदेने या चऱ्या का बुजवल्या नाहीत, असा सवाल या वेळी करण्यात आला. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित खड्ड्यांमध्ये सध्या हॉटमिक्सचा एक थर टाकण्यात आला असून लवकरच दुसरा थर टाकून या चऱ्या पूर्णपणे बुजवण्यात येतील, असे आश्वासन दिले. याशिवाय मुरादपूर येथील गणपती मंदिर ते अमेय पार्क ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चर्चा करताना, पावसाळ्यापूर्वी शक्य त्या ठिकाणी ब्लॉक बसवून आणि उर्वरित रस्त्याची डागडुजी करून मार्ग सुस्थितीत आणला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बाळकृष्ण नगर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याच्या समस्येवर बोलताना, संबंधित ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद करून काही बांधकाम करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्रांसह उद्या नगरपरिषदेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, त्या वेळी शहरप्रमुख सचिन कदम यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या सर्व प्रश्नांवर शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ कार्यवाही न केल्यास शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

या आंदोलनात्मक पाठपुराव्याप्रसंगी उपशहरप्रमुख संजय रेडीज, मनोज पांचाळ, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, विभागप्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर, संतोष मिरगल, बंधू कदम, शाखाप्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, विभाग अधिकारी राहुल गुरव, सोहम कदम, मनीष काणेकर आणि आशिष कदम यांच्यासह संबंधित प्रभागांतील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3401479
Share This Article