संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असूर्डे येथे अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरफोडी करून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल असा सुमारे २७,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनायक कृष्णनाथ संसारे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना १८ जुलैच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ते सकाळी ६.१५ दरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने घरातील कपाट उघडून त्यामधील १०,००० आणि ४,००० रुपये अशी रोख रक्कम, ३०० व २०० रुपये किमतीच्या चांदीच्या दोन जोडव्या, अंदाजे १,५०० रुपये नाण्यांमध्ये, ५०० रुपये किमतीची सोन्याची नाकातील जुनी पुली, सोन्याचा मुलामा असलेली ५०० रुपयांची चेन, ५०० रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि १०,००० रुपये किमतीचा Vivo Y39 मोबाईल असा एकूण २७,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
या चोरीप्रकरणी भादंवि कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
संगमेश्वर: कोंड असूर्डे येथे घरफोडी करून २७,५०० रुपयांचा ऐवज लंपास
