रत्नागिरी: शहरातील जाकिमिऱ्या येथील समुद्रकिनारी एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हेमंत रामचंद्र सावंत (वय ६३, रा. जाकिमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते १७ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हेमंत सावंत हे १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून घरातून बेपत्ता होते, अशी माहिती त्यांचा मुलगा हर्षद सावंत यांनी पोलिसांना दिली. नातेवाईक आणि कुटुंबिय त्यांचा शोध घेत असताना, आज, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता जाकिमिऱ्या येथील समुद्रकिनारी पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
तात्काळ त्यांना ॲम्ब्युलन्सने रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्षद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरातून निघून गेले होते. त्यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह समुद्रात आढळून आला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : जाकीमिऱ्या येथे समुद्री किनारी सापडला वृद्धाचा मृतदेह
