राजापूर : तालुक्यातील एका गावात जादूटोणा झाल्याचा प्रकार रविवार 26 ऑक्टोबर रोजी समोर आला. या गावातील जांगलदेव परिसरात झाडाला लाल कापड्यात नारळ बांधलेला होता. शिवाय दुसऱ्या बाजूला लिंब, बांगड्या, नारळ, दोरे आणि कपड्यांचं गाठोड आढळून आल्याने चर्चेला उधाण आले होते. याबाबतची बातमी ग्रामीण वार्ताने प्रसिद्ध केल्यानंतर राजापुरात खळबळ उडाली. कोणत्या गावात हा प्रकार झाला असेल याची राजापूर तालुक्यात सर्वत्र चर्चा होती. काहीना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. हा जादूटोणा किंवा भगतगिरीचा प्रकार असावा असे बोलले जात आहे. मात्र ‘केळ’ आणि ‘वडे’ खाणाऱ्या ज्या भगतांनी हे कृत्य केले त्यांच्या मात्र हे प्रकरण लक्षात आले आहे. आपल्यावर हे प्रकरण शेकणार की काय असे त्यांना वाटत आहे. यामुळे त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार त्या गावात दोन गट आहेत. या गावात मोठ्या प्रमाणात भगतगिरी चालते. दोन गटाच्या वादातून एका गटातील लोकांनी भानामतीचा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. एका गटाला संपवण्यासाठी भगतांनी भलमोठी यादी दिली होती. त्या यादीनुसार ते साहित्य आणण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास गावातील जांगलदेव असलेल्या भागात हा प्रकार करण्यात आला. एका झाडाला लाल कापडात नारळ बांधण्यात आला होता. तसेच दुसऱ्या बाजूला लिंबू, बांगड्या आणि कपडे असं साहित्य त्या ठिकाणी ठेवून पुरवणी करण्यात आली. भगतांनी आपल्या पोटापाण्याची चांगलीच सोय करून घेतली. पैसा उकलल्यानंतर आपलं बिंग फुटणार नाही असे त्यांना वाटत होते. मात्र ‘केळं’ आणि ‘वडे’त माशी कुठे शिंकले हे कळलेच नाही. झाले उलटेच हा सारा प्रकार समोर आल्याने गावात चर्चा सुरू आहे. गावातील चर्चेला उधाण आल्याने ज्या भगतांनी हे कृत्य केले त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. आता आपले काही खरे नाही याची त्यांना खात्री पटली आहे. प्रकरण अंगाशी येणार असे वाटत असल्याने ते घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत. हे कृत्य कुणी केलं असावं याचा सगळ्यांना अंदाज आला आहे.
राजापुरात भगतगिरी करणाऱ्या भगतांचे धाबे दणाणले






