कर्जतमध्ये माती माफियांचा कहर; रॉयल्टीशिवाय कोट्यवधींचा खेळ?

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

कर्जत : तालुक्यातील विविध परिसरात शेतजमिनीवरील मातीचे बेकायदेशीर उत्खनन करून ती वीटभट्ट्यांसाठी तसेच विक्रीसाठी नेली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महसूल कर व शासनाची रॉयल्टी न भरता सकाळच्या तसेच रात्रीच्या वेळेत जेसीबी व डंपरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती काढली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

जमीन सपाट करण्याच्या नावाखाली काही ठिकाणी खोलवर खोदकाम करण्यात आले असून मातीची थेट विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उत्खननासाठी आवश्यक असलेली अधिकृत परवानगी न घेता काम सुरू असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवसा हालचाल मर्यादित ठेवून रात्रीच्या वेळेत डंपरच्या फेऱ्या वाढवल्या जात असल्याचेही नागरिकांचे निरीक्षण आहे.

या प्रकारामुळे शेतीयोग्य सुपीक माती नष्ट होत असून भविष्यात शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा होत आहे. धूळ व आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले असून काही भागात पाण्याचा नैसर्गिक निचराही बिघडल्याचे दिसून येत आहे.

स्थानिकांनी संबंधित विभागांकडे तक्रारी केल्याचा दावा केला असला तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तातडीने पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत व वापरातील यंत्रसामग्री व वाहने जप्त करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *