GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी एमआयडीसी मधील मत्स्य उत्पादक कंपनीची १.५८ कोटींची फसवणूक

Gramin Varta
348 Views

रत्नागिरी :  मिरजोळे एमआयडीसी येथील मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स या कंपनीची सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्नाटक येथील एका निर्यातदार कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिलानी मरीन प्रॉडक्ट्स ही कंपनी मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचे काम करते. या कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले हैदरअली शब्बीर सनदी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ६ सप्टेंबर २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. मंगळुरू येथील किशोर कुमार आणि कंपनी (एक्सपोर्ट्स) प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीधरन किशोर कुमार यांनी मध्यस्थ म्हणून जिलानी मरीन कंपनीकडून इटलीतील अर्दिमार एस.आर.एल. या कंपनीसाठी २४ टन मत्स्य उत्पादनांची मागणी केली होती. मालाची रक्कम वेळेत देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी कंपनीचा विश्वास संपादन केला.

संशयित आरोपी श्रीधरन किशोर कुमार यांनी जिलानी मरीन कंपनीची दिशाभूल करून सुमारे १ लाख ८२ हजार डॉलर्स किमतीचा २४ टन माल इटलीतील कंपनीला पाठवण्यास भाग पाडले. मात्र, या मालाची विक्री झाल्यानंतरही त्यापोटी येणारी १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांची रक्कम जिलानी मरीनच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवून कंपनीचा विश्वासघात केला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने पोलिसांत धाव घेण्यात आली. या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(३) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3366904
Share This Article