GRAMIN SEARCH BANNER

लाडक्या बहिणींची गैरसोय खपवून घेणार नाही; चिपळूण युवासेनेचा पोस्ट प्रशासनाला सज्जड इशारा

चिपळूण (प्रतिनिधी): कळमुंडी गावातील ‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांना गेल्या सहा महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमधून मानधन मिळत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रश्नावर आता युवासेना आक्रमक झाली आहे. महिलांना सोसाव्या लागणाऱ्या या आर्थिक आणि मानसिक त्रासाची दखल घेत युवासेना तालुका प्रमुख प्रितम नंदकुमार वंजारे यांनी आज मार्गताम्हाणे पोस्ट ऑफिसवर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून महिलांना हक्काच्या पैशांपासून वंचित ठेवले जात असल्याबद्दल यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे पैसे खात्यात जमा होऊनही केवळ पोस्ट ऑफिसच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे ग्रामीण भागातील महिलांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन युवासेनेच्या वतीने पोस्ट ऑफिसला लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे, महिलांच्या खात्यातील तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून त्यांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना प्रितम वंजारे यांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले. सर्वसामान्य महिलांच्या हक्काच्या पैशांबाबत प्रशासन इतके उदासीन कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जर येत्या काही दिवसांत हा प्रश्न सुटला नाही आणि महिलांची गैरसोय कायम राहिली, तर युवासेना आपल्या खास ‘स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडेल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनामुळे पोस्ट प्रशासन खडबडून जागे झाले असून, आता कळमुंडीतील महिलांना न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3487124
Share This Article