हिरवे सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबू पिकाकडे वळण्याचे पाशा पटेल यांचे आवाहन
चिपळूण : सुवर्ण कोंकण फार्मर प्रोड्यूसर कंपनी, चिपळूण यांच्या पुढाकाराने बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, शेतकरी चळवळीतील नेते व धोरण अभ्यासक पाशा पटेल उपस्थित होते. त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि पर्यायी उत्पन्न स्रोत याबाबत सातत्याने भूमिका मांडली असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी ते कार्यरत आहेत.
कोकण प्रदेश डोंगराळ, उताराचा व जास्त पर्जन्यमान असलेला आहे. पारंपरिक पिके प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे अतिवृष्टी, अनियमित पाऊस, दीर्घ कोरडे कालखंड आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे.
अतिवृष्टीमुळे मृदा धूप वाढते, सुपीक माती वाहून जाते, तर काही भागात पूरस्थिती निर्माण होते. दुसरीकडे पावसाचा खंड पडल्यास बागायती पिकांना फटका बसतो. हवामान बदलामुळे तापमानातील चढ-उतार वाढले असून कीड-रोगांचे प्रमाणही वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कमी पाण्यात, कमी देखभालीत आणि हवामान बदलाला तोंड देणारे पर्यायी पीक निवडणे ही काळाची गरज असल्याचे पटेल यांनी नमूद केले.
पाशा पटेल यांनी बांबूला “हिरवे सोन” असे संबोधत तो कोकणातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणारा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले.बांबू हे बहुवर्षायू पीक असून एकदा लागवड केल्यास ३०–४० वर्षे उत्पादन देऊ शकते. लागवडीनंतर ३–४ वर्षांत उत्पन्न सुरू होते आणि दरवर्षी कापणी करता येते. कमी पाण्यात वाढणारे, मृदा धूप रोखणारे आणि डोंगराळ भागातही चांगली वाढ करणारे हे पीक शेतकऱ्याला नियमित उत्पन्नाची हमी देऊ शकते.
बांबूची बाजारपेठ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असून बांधकाम, फर्निचर, कागद उद्योग, बायोफ्युएल आदी क्षेत्रात मोठी मागणी आहे.
बांबूपासून तयार होणारी उत्पादने
बांबू हा बहुउपयोगी वनसंपत्तीचा स्रोत आहे. त्यापासून –
बांधकामासाठी सळया, बीम, फळ्या
फर्निचर, घरगुती सजावटीच्या वस्तू
अगरबत्ती काडी, टूथब्रश, कटलरी
कागद, पॅकेजिंग साहित्य
चारकोल, बायोचार, बायोफ्युएल
कापड (बांबू फायबर), हस्तकला वस्तू
शेतीसाठी आधारकाठी, शेडनेट स्ट्रक्चर
अशा विविध उत्पादनांची निर्मिती करता येते. त्यामुळे केवळ कच्चा माल विक्री न करता प्रक्रिया उद्योग उभारल्यास मूल्यवर्धन होऊन अधिक रोजगारनिर्मिती शक्य आहे.
काळाची गरज पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम शेती-
जागतिक तापमानवाढ, वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकविरोधी मोहिमेमुळे पर्यावरणपूरक पर्यायांची मागणी वाढली आहे. बांबू हा जलद वाढणारा, कार्बन शोषण करणारा आणि पर्यावरणपूरक स्रोत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अशा बहुउपयोगी पिकांकडे वळणे अत्यावश्यक असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.बांबू मातीची धूप रोखतो, कार्बन डायऑक्साइड शोषून हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देतो.
नदीकाठ, डोंगर उतार, पडीत जमीन यावर बांबू लागवड केल्यास जमीन उत्पादक बनते. तसेच वनसंपत्तीवरील ताण कमी होतो.
ग्रामीण भागाचा विकास बांबू लागवडीसोबत प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध होईल. महिला बचतगट, युवक मंडळे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) यातून मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.गाव पातळीवर क्लस्टर विकसित करून लागवड-प्रक्रिया-विपणन अशी साखळी उभारल्यास ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होवू शकतो.
आज जगभरात शाश्वत विकास (Sustainable Development), कार्बन क्रेडिट, हरित बांधकाम या संकल्पनांवर भर दिला जात आहे. चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया यांसारख्या देशांनी बांबू उद्योगाच्या माध्यमातून मोठी अर्थव्यवस्था उभी केली आहे. भारतातही राष्ट्रीय बांबू मिशनद्वारे या क्षेत्राला चालना दिली जात आहे.
जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक व पर्यावरणपूरक उत्पादनांची मागणी वाढत असल्याने बांबूला मोठे भविष्य असल्याचे पटेल यांनी नमूद केले.
यावेळी पाशा पटेल यांनी सुवर्ण कोंकण फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सर्व सदस्यांना आवाहन केले की, “आपण सर्वांनी संघटितपणे बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. मी स्वतः सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करण्यास तयार आहे.”
बैठकीत उपस्थित सदस्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोकणात बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी कंपनीचे चेअरमन सर्वश्री प्रकाश (बापू ) काणे, रामशेठ रेडीज, डॉ गौरव बारटक्के, मिलिंद जोगलेकर, श्रीकृष्ण वाभळे, महेश जाधव, प्रल्हाद ( बाळा ) लाड, विश्वनाथ सकपाळ व मनोज गांधी तसेच कृषि विभागाचे श्री . शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी व श्री शत्रुघ्न म्हेत्रे तालुका कृषि अधिकारी चिपळूण विकास पिसाळ, मंडळ कृषि अधिकारी व श्री संतोष जाधव सहाय्यक कृषि अधिकारी उपस्थित होते .





