GRAMIN SEARCH BANNER

परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्या गुरुकुल विभागात संगीत कक्षाचे उद्घाटन

संगमेश्वर:- शतकोत्तर ज्ञानदानाचे पवित्र कार्य नेमस्त होऊन करणाऱ्या चिपळूण मधील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुकुल विभागात २१ जून जागतिक संगीत दिनाच्या औचित्याने स्वतंत्र, सुसज्ज,अद्ययावत अशा संगीत कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले.

आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करणारे श्रीकृष्ण चिंतामण तथा आप्पासाहेब दांडेकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून तयार झालेल्या या संगीत कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कै.अप्पा दांडेकर यांचे कुटुंबीय श्री.संतोष दांडेकर आणि श्री.मनोहर केळकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ अर्थ सल्लागार श्री.जयंतराव विद्वांस, सौ.सीमा विद्वांस,कुमारी संचिता दांडेकर आणि डॉ.सुषमा मेहेंदळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रशालेच्या दुसऱ्या मजल्यावरील गुरुकुल विभागाच्या संगीत कक्षाचे उद्घाटन संतोष दांडेकर आणि जयंतराव विद्वांस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.आप्पासाहेब दांडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि सरस्वती पूजनाने झाले.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत गेली अनेक वर्ष प्रवाहीपणे जिवंत ठेवणाऱ्या अनेक दिग्गज  कलाकारांच्या बहुमोल विचारांनी आणि चित्रांनी आकर्षक अंतर्गत सजावट केलेल्या संगीत कक्षातील पायपेटी, संवादिनी, तबला,पखवाज अशा पारंपारिक वाद्यांसोबत सिंथेसायझर, क्लॅप बॉक्स, जेम्बे ,काँगो अशा आधुनिक वाद्यांची सजावट प्रमुख अतिथी पाहत असताना संगीतातील जाणकार आणि कै.आप्पा दांडेकरांची पुतणी असलेल्या सौ.सीमाताई विद्वांस यांनी पायपेटी वादन केले.

औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुरेल सरस्वती स्तवन आणि स्वागत पद्याने झाली. संस्थेचे विश्वस्त धनंजय चितळे यांनी आपल्या प्रास्ताविकात शालेय जीवनात संगीत शिक्षणाचे महत्व आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेची भूमिका सांगितली. त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या यथोचित सन्मानानंतर कै.आप्पांच्या दीर्घकाळ सहवासात असणारे त्यांचे भाचे मनोहर केळकर यांनी आपल्या हृद्य मनोगतातून अप्पांच्या आठवणी जाग्या केल्या.कै.आप्पा दांडेकर यांचे संघ समर्पित जीवन याचा संक्षिप्त स्वरूपात परिचय होईल अशी प्रत्यक्ष कै.आप्पांची एक संग्रहित ध्वनीचित्रफीत पाहून झाल्यावर प्रमुख पाहुणे श्री.जयंतराव विद्वांस यांनी देणगी देण्यामागचा विचार आणि त्याकरिता डॉ.प्रशांत पटवर्धन यांच्या संपर्कातून मिळालेली दिशा उलगडत घडलेली प्रक्रिया सांगितली आणि देणगीचा संगीत कक्षासाठी झालेला योग्य वापर याबाबत समाधान व्यक्त करत परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संगीत कक्षाला शुभेच्छा दिल्या.

प्रशालेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध सर यांनी हा संगीत कक्ष ही प्रशालेची गरज होती आणि या माध्यमातून येत्या काही वर्षात उत्तम सांगीतिक कार्य निश्चित घडेल असा विश्वास व्यक्त करत आश्वस्त केले.
या कार्यक्रमासाठी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर अभ्यंकर, साईनाथ कपडेकर,धनंजय चितळे, रवींद्र करंदीकर, उपकार्याध्यक्ष श्री. राजीव कानडे, सहकार्यवाह, विजय चक्रदेव आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य, पराग भावे,  तुषार गोखले, सुनील जोशी, वैशाली निमकर  तसेच संस्थेच्या सर्व शाळातील मुख्याध्यापक, पालक आणि संगीत प्रेमी उपस्थित होते. संस्थेचे सदस्य अभय चितळे यांनी सर्व मान्यवर आणि दांडेकर कुटुंबियांचे आणि कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Total Visitor Counter

2474805
Share This Article