देवरुख : मुंबई विद्यापीठाच्या ५७व्या आंतरमहाविद्यालय युवा महोत्सव:२०२४-२५ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार व मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघातील फाईन आर्ट कला प्रकारांचे मार्गदर्शक श्री. विलास विजय रहाटे यांना डॉ. ममता रानी अग्रवाल(ॲडिशनल सेक्रेटरी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली) यांनी सन्मानित केले. विलास रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील २०व्या इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, ३८ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव आणि ३८व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात फाईन आर्टमध्ये मिळालेल्या उत्तम यशाची दखल मुंबई विद्यापीठाने या सन्मानाच्या रूपाने घेतली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या विशेष पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.(डॉ.) रवींद्र कुलकर्णी(व्हाईस चान्सलर, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई), डॉ. ममता रानी अग्रवाल (ॲडिशनल सेक्रेटरी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली), प्राचार्य (डॉ.) अजय भामरे(प्रो-व्हाइस चान्सलर, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई), श्री. बिभीषण चावरे(डायरेक्टर, कल्चरल अफेयर्स, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), डॉ. प्रसाद कारंडे रजिस्टार, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ विलास रहाटे यांनी अभिनेते श्रेयस तळपदे आणि अतिथी डॉ. ममता रानी अग्रवाल यांची साकारलेली रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली. दोन्ही मान्यवरांनी विलास रहाटे यांच्या रांगोळी कलेचे भरभरून कौतुक केले. विलास रहाटे यांनी सलग तीन वर्ष मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमला मार्गदर्शन करून उत्तम यश प्राप्त करून दिले आहे. विलास रहाटे यांनी आपल्या विद्यार्थीदशेत मुंबई विद्यापीठाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करून मुंबई विद्यापीठासाठी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली होती. विलास रहाटे यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.