रत्नागिरी: महिला पतंजली योग समितीतर्फे अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय महिला मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला.दापोली, गुहागर, रत्नागिरी येथून बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमा जोग यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, पतंजली योग समिती व सर्व परिवार रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून जिल्ह्यात कार्यरत आहे. सनातन वैदिक धर्माचा प्रचार, प्रसार योगवर्गाच्या नियमित योगकक्षा चालवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वदेशीचा प्रचार प्रसार आणि आरोग्याला हितकर व भेसळविरहित खाद्यपदार्थ व स्वदेशी वस्तू वापराव्यात. पतंजली योगपीठाने स्वदेशी वस्तू सर्वांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी चिकित्सालय, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून, ऑनलाइन वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.
सौ. रमा जोग, सौ. अनघा जोशी, सौ. संगीता कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन केले. रत्नागिरी जिल्ह्याच्या नूतन अध्यक्ष सौ. हर्षदा डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याचा उद्देश, संघटनात्मक कामाचा त्यांनी आढावा घेतला. नियमित आणि नि:शुल्क योगकक्षा चालविणाऱ्या योग शिक्षकांना हरिद्वार येथून स्वामी रामदेवजी यांनी प्रसाद म्हणून जॅकेट आणि औषध दर्शन मराठी पुस्तक पाठवले. अशा २० जणांना सौ. रमा जोग यांनी सन्मानित केले.
अक्षता साळवी, रागिणी रिसबूड यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. आरोही पंडित व युक्ता पंडित यांनी नृत्य सादर केले. नंदा बिर्जे यांनी लांजा येथे चालवत असलेल्या गोशाळेबद्दल माहिती दिली.
रत्नागिरी : पतंजली योग समितीच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
