रत्नागिरी: आपणास घरासाठी कर्ज घ्यायचे असेल तर प्रथम आपणास आपली सीबील गुणवत्ता उंचावण्यासाठी वाहन, मोबाईल या नावाने कर्ज घ्यावी लागतील. एकदा सीबील गुणवत्ता उंचावली की तुम्हाला १० लाखाचे कर्ज मिळेल असे रत्नागिरीतील एका महिलेला सांगून डोंबिवलीतील तीन भामट्यांनी या महिलेची एकूण सात लाख ७९ हजार रूपयांची कर्जाच्या नावाने फसवणूक केली आहे.
सुपर्णा अंकुश ढेपे (३४) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या मुंबईत लोअर परल येथे आपल्या आईकडे राहत होत्या. त्यांचा विवाह गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील तरूणाबरोबर झाला. त्यानंतर त्या सासरी कोकणात गेल्या. रत्नागिरी येथील डी मार्टमध्ये त्या नोकरी करत होत्या. त्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी काम केले. या दोन्ही नोकऱ्या गेल्याने सुपर्णा नोकरीच्या शोधात होता. या कालावधीत त्यांना अनिल गुप्ता भेटले. त्यांनी अंधेरी येथील कामाबाबत सुचविले. तेथे शिक्षणाची अट असल्याने सुपर्णा यांचे काम झाले नाही.
सुपर्णा यांना आपल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर गावी घर बांधायचे होते. यासाठी त्यांना दहा लाख रूपयांचे कर्ज घ्यायचे होते. अनिल गुप्ता यांनी सुपर्णा यांना तुम्ही डोंबिवलीत गेला तर तेथे तुमचे कर्जाचे काम होईल. तुम्हाला कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते भरावे लागणार नाहीत, असे सांगितले. गुप्ता यांनी सुपर्णा यांना मार्चमध्ये डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील लिज्जत पापड समोरील एका शोरूमध्ये नेले. तेथे एक महिला तीन इसम बसले होते. समीर बोस, सुशांत गोवीकर, किसन पोपट अशी त्यांनी आपली ओळख तक्रारदार महिलेला करून दिली.
त्यांनी आपणास कर्ज घ्यावयाचे असेल तर प्रथम आपणास सीबील गुणवत्ता उंचावी लागेल. यासाठी वाहन कर्ज घ्यावे लागेल. ते कर्ज आम्हीच फेडणार असे सांगितले. सुपर्णा ढेपे यांच्याकडून या शोरूममधील इसमांनी कर्जासाठीची आवश्यक कागदपत्रे घेतली. आणि एकूण चार दुचाकींचे तीन लाख ६१ हजाराचे कर्ज सुपर्णा यांचे नावे घेतले. सीबील गुणवत्ता उंचावण्यासाठी आपणास मोबाईलवर कर्ज घ्यावे लागेल असे सांगून चार मोबाईल खरेदीसाठी एकूण चार लाख १७ लाखाचे कर्ज घेतले. आता तुमची सीबील गुणवत्ता वाढेल असे सांगून तुम्हाला दहा लाखाचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे इसमांनी सुपर्णा यांना सांगितले. दुचाकीचे चार हप्ते सुरूवातीला समीर बोस यांनी भरले. मोबाईलचे चार हप्ते सुशांत गोवीकर, किसन पोपट यांनी भरले.
त्यानंतर जुलै,ऑगस्टमध्ये त्यांनी कर्ज हप्ते न भरल्याने बँकेचे अधिकारी आपल्या रत्नागिरीतील घरी येऊन कर्ज रक्कम भरण्यासाठी आग्रह करू लागले. आपण सुरूवातील जवळील सोन्याचे दागिने, मामाकडून उसने पैसे घेऊन तीस हजार रूपये भरणा केले. हे अधिकारी हप्ते का भरत नाहीत हे पाहण्यासाठी आपण डोंबिवलीत त्या शोरूममध्ये आले. त्यावेळी ते शोरूम बंद करून आपल्या नावे घेतलेल्या दुचाकी, मोबाईल विकून पसार झाल्याचे समजले. आपला विश्वास संपादन करून या तीन भामट्यांनी आपली कर्जाच्या माध्यमातून सात लाख ७९ हजार रूपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार सुपर्णा ढेपे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
कर्जाच्या नावे रत्नागिरीतील महिलेची डोंबिवलीतील भामट्यांकडून फसवणूक






