GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण पोलिसांकडून ४४ गहाळ मोबाईल हस्तगत; मूळ मालकांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान

Gramin Varta
205 Views

चिपळूण : प्रवासादरम्यान अथवा अन्य कारणांमुळे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात चिपळूण पोलिसांनी मोठे यश संपादन केले असून, शोध लावण्यात आलेले ४४ मोबाईल संबधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्याने ही विशेष मोहीम राबवली होती. गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल अर्जांची दखल घेत पोलीस हवालदार संतोष शिंदे आणि महिला पोलीस अंमलदार वर्षा रहाटे यांनी तांत्रिक तपासाद्वारे विशेष प्रयत्न करून या मोबाईल संचांचा शोध लावला.

सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते कागदपत्रांची सखोल पडताळणी करून हे मोबाईल मालकांना सुपूर्द करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हवालदार संतोष शिंदे व वर्षा रहाटे यांनी आतापर्यंत गहाळ मोबाईल रजिस्टरमधील नोंदीनुसार एकूण ५८ मोबाईल शोधून काढले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपले गहाळ झालेले फोन पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून, या कामगिरीमुळे पोलिसांविषयीचा जनमानसातील विश्वास अधिक दृढ झाला आहे. गहाळ मोबाईलच्या तक्रारी वेळेत नोंदवल्यास त्यांचा शोध घेणे सुलभ होते, हेच या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitor Counter

3370201
Share This Article