जाकादेवी/ संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं.१ या शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सवाचा शुभारंभ शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मान.उदय सामंत यांच्या हस्त मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात येणार आहे.
मालगुंड येथे ब्रिटिश राजवटीत स्थापन करण्यात आलेल्या जीवन शिक्षण शाळेला ५ ऑगस्ट रोजी १७५ वर्षे पूर्ण होत आहे. १८५१ साली या शाळेची स्थापन झाली. या शाळेचे माजी विद्यार्थी आज राज्यात तसेच देश विदेशात कार्यरत आहेत. ब्रिटिश काळातील महाराष्ट्रातील दोन ते तीन नंबरची ही शाळा म्हणून गणली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ या शाळेला १७५ वर्षे पूर्ण होत असल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याला ही बाब भूषणावह आहे.
या शतकोत्तर अमृत महोत्सवासाठी या शाळेचे आजी-माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ ,पालक, ग्रामपंचायत सरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच केंद्रातील सर्व केंद्र शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत. शतकोत्तर महोत्सवाचा शुभारंभ जीवन शिक्षण शाळेत संपन्न झाल्यानंतर वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर बळीराम परकर विद्यालय मालगुंड येथील कै.सदानंद परकर सभागृहात शतकोत्तर अमृत महोत्सवी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ ,शिक्षणप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ च्या मुख्याध्यापिका तसेच शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.