रत्नागिरी : येथील जिल्हा जलतरण असोसिएशन आणि ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या दोन वर्षे तीन महिने वयाच्या समर्था रुचिरा साईप्रसाद साळवी या चिमुकलीने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. आपल्या वयोगटापेक्षा अधिक वयाच्या, पाच वर्षांच्या मुलींसोबत स्पर्धेत उतरून तिने मिळवलेले हे यश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शासकीय जलतरण तलाव, साळव स्टॉप येथे २५ डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १२० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे समर्था ही या स्पर्धेतील सर्वांत कमी वयाची स्पर्धक ठरली. सव्वा दोन वर्षांची असतानाही तिने आपल्या पेक्षा वयाने मोठ्या मुलींना मागे टाकत हे यश मिळवले.
समर्थाला जलतरणाचे धडे प्रशिक्षक विवेक विलणकर यांनी दिले. गेल्या पाच महिन्यांपासून तिच्याकडून सातत्याने सराव करून घेण्यात आला. पाऊस असो वा थंडी, समर्थाने नियमितपणे पोहण्याचा सराव केला आणि त्याचे फळ तिला या स्पर्धेत मिळाले. तिच्या या घवघवीत यशामागे प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन आणि मेहनत मोलाची ठरली असून, समर्थाच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रत्नागिरीतील सव्वा दोन वर्षांची समर्था जलतरण स्पर्धेत चमकली; जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक








