GRAMIN SEARCH BANNER

कडवई, तुरळ परिसरातून गुरांची चोरटी वाहतूक पुन्हा सुरु; गोप्रेमी व नागरिकांत संताप

Gramin Varta
656 Views

मिलिंद चव्हाण / कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुरळ परिसरातून रात्रीच्या वेळी गुरांची चोरटी वाहतूक होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. ही गुरे कत्तलीसाठी मलकापूर–पाटण परिसरातील दलालांकडे विकली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या कामात येथील काही तरुण सहभागी असून, या अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर त्यांची दबंगगिरी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी या भागातून कत्तलीसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती. स्थानिक गोप्रेमी तरुणांच्या कडक भूमिकेमुळे ती बंद झाली होती. मात्र काही काळानंतर पुन्हा एकदा गुरांची चोरटी वाहतूक वाढू लागल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक तरुण पुन्हा या धंद्याकडे वळल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हालचालींची माहिती गोप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना समज देत तातडीने हा प्रकार थांबवण्याची चेतावणी दिली आहे. पुढील काळात असे प्रकार आढळल्यास कठोर भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, भविष्यात निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3369219
Share This Article