GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लोहार यांची नियुक्ती

Gramin Varta
181 Views

गौरव पोंक्षे / माखजन : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी किरण लोहार यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील सखोल ज्ञान, कार्यतत्परता आणि उत्कृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे त्यांनी शिक्षण विभागात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

किरण लोहार हे सध्या रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागात योजना शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी सन २०१६ मध्ये कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सह सचिव आणि त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या काळात अनेक विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानास पात्र ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. या शाळांना शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळवून देण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

लोहार यांनी कोकण बोर्डाचे सह सचिव, विभागीय सचिव, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर व कोल्हापूर येथे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग या पदावरही कार्य केले आहे.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षण विभागात अधिकारी म्हणून प्रवेश केलेल्या किरण लोहार यांना शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक बाबीची सखोल माहिती आहे. शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि शिक्षकांप्रती सहकार्यशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

किरण लोहार यांच्या पुन्हा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत असून, त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3201008
Share This Article