GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यातील सहकारी सोसायट्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी; चौकशीचे आदेश

Gramin Varta
138 Views

खेड : तालुक्यातील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायट्यांच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य (पुणे–१) यांनी अधिकृत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

उपआयुक्त (कर्मचारी), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी पाठविलेल्या पत्रानुसार संबंधित सोसायटीविरोधात दाखल तक्रारींच्या अनुषंगाने शासन परिपत्रक व २१ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयाच्या आधारे ही चौकशी करण्यात येणार आहे.

या प्रकरणातील मूळ तक्रारदार दीपक मोहिते यांच्या अर्जाचा प्राथमिक तपास करून पुढील चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. समाजहितासाठी कार्यरत असलेल्या तक्रारदारांनी सोसायटींच्या कार्यपद्धतीतील अनियमितता, कारभारातील सुसूत्रतेचा अभाव तसेच सदस्यांच्या आर्थिक हिताला झालेली हानी याबाबत तक्रार दाखल केली होती.

पत्रानुसार सन २००० ते २०२४ या कालावधीत सोसायटीच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, बैठकीचे ठराव आणि आर्थिक नोंदी तपासणीसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रे तात्काळ व विलंब न करता उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश देण्यात आले असून, अनियमितता आढळल्यास संबंधितांवर पुढील शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या चौकशीचा सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडून राज्य कार्यालयाकडे सादर केला जाणार असून या कारवाईमुळे खेड तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीवरील पारदर्शकता व जबाबदारीचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभारासाठी ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

Total Visitor Counter

3199498
Share This Article