मुंबई : एचआयव्हीग्रस्त रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी देशभरात एआरटी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर रुग्णांना औषधे उपलब्ध करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशनही केले जाते.
मात्र मागील सहा वर्षांमध्ये राज्यातील ३८ हजार ३३० एचआयव्ही रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले असून, यंदा तब्बल १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडल्याचे उघडकीस आले आहे. उपचार अर्धवट सोडण्यामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने एड्सला प्रतिबंध करण्यासाठी एचआयव्ही विषाणूचा भार २०३० पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नवीन संसर्ग आणि एड्स संबंधित मृत्यू २०१० च्या तुलनेत ९० टक्क्यांनी कमी करायचे आहेत. तसेच ९५-९५-९५ हे लक्ष्य ठेवले आहे. याअंतर्गत ९५ टक्के एचआयव्ही बाधित रुग्णांचे निदान, उपचार आणि त्यांच्या शरीरातील एचआयव्ही विषाणूचा भार कमी करण्यावर भर दिला आहे.
त्यानुसार एचआयव्ही बाधित रुग्णाची नोंद, त्यावर उपचार व त्याचे समुपदेशन करण्यासाठी सर्वत्र एआरटी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमार्फत उपचार अर्धवट सोडल्यास त्याच्याशी संपर्क साधून त्याच्यावर पुन्हा उपचार केले जातात. मात्र असे असले तरी महाराष्ट्रात मागील सहा वर्षांमध्ये अर्धवट उपचार सोडणाऱ्यांची संख्या २७ हजार इतकी आहे. मात्र यामध्येही २०२५-२६ मध्ये उपचार अर्धवट सोडणाऱ्यांची संख्या १५ हजार ६०५ इतकी असल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या माहितीतून निदर्शनास आले आहे.
उपचार सोडण्यामागची कारणे
उपचार अर्धवट सोडण्यामागे सामाजिक कलंक, भीती, आर्थिक अडचणी, स्थलांतर, औषधांचे दुष्परिणाम, तसेच उपचार केंद्रांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ही प्रमुख कारणे आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव तसेच जनजागृतीची कमतरता यामुळेही ही समस्या अधिक तीव्र होत आहे.
वर्षातील नव्हे, २१ वर्षांतील आकडेवारी
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २००४ मध्ये एआरटी सेवा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ३९५ एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना एआरटी उपचार सुरू करण्यात आले आहेत. २००४ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपचार अर्धवट सोडलेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ४३० इतकी आहे. हे प्रमाण एकूण ‘ऑन-एआरटी’ रुग्णांपैकी फक्त ३.७ टक्के इतके आहे. १५ हजार ४३० एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींपैकी २३.२६ टक्के रुग्ण स्थलांतरित आहेत. एचआयव्ही/एड्स हा अधिसूचित आजार नसतानाही, ९८ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांना उपचारांत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत.
सहा वर्षांतील रुग्णसंख्या
२०२०-२१ – ७९७
२०२१-२२ – १४५१
२०२२-२३ – ४२५८
२०२३-२४ – २४८८
२०२४-२५ – २५७५
२०२५-२६ – १५४३०
धक्कादायक! राज्यात वर्षभरात १५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवटच घेतले उपचार






