संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (मुरलीधरआळी) येथे बंद बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील करंजारी येथेही बंद घरातून १२ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय पर्शराम पांचाळ हे कुटुंबासह १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान सुट्टीसाठी मुंबईला गेले होते. गुरुवारी मध्यरात्री ते घरी परतले असता घरातील पाठीमागचा दरवाजा उचकटलेला व कपाटे फोडलेली आढळली. तात्काळ त्यांनी साखरपा पोलिसांना कळवले.
चोरट्यांनी दोन बेडरूममधील लोखंडी कपाटे आणि देवघरातील लाकडी कपाट फोडून त्यातील दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चार अंगठ्या, मंगळसूत्र, बुगडी आणि बोरमाळ यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, हे.कॉ. नितीन जाधव, महिला पोलीस मनस्वी पावसकर आदी उपस्थित होते.
घटनास्थळी ठसेतज्ञ, श्वानपथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यात सलग वाढत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्यास सुरुवात केली आहे.







