गुहागर | प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपली निष्ठा बदलत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. खारवी समाज भवन, हेदवत, हेदवी येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोहळ्यामुळे गुहागर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जि.प. उपाध्यक्षा महेश नाटेकर, गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, पुनम पाष्टे, माजी सरपंच व विभागप्रमुख समीर डिंगणकर, विनायक कांबळे, वेळणेश्वर माजी सरपंच नवनीत ठाकूर, हेदवी सरपंच आर्या मोरे, साखरीआगर सरपंच दुर्वा पाटील, पिंपर सरपंच अनिल घाणेकर, शीर सरपंच विजय धोपट, पाली सरपंच अरुण पेजले, पाभरे सरपंच सुभाष पाष्टे, चिंद्रावळे माजी सरपंच बबन ठीक, शीर माजी सरपंच लक्ष्मण आंबेकर, साखरी आगर माजी सरपंच विठोबा फणसकर, माजी सरपंच लक्ष्मण पावसकर, साखरी आगर मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मारुती होडेकर, संपदा केळकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मुंबईसह तालुक्यातील विविध भागांतील उबाठा गटाचे शाखाप्रमुख, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शिवसेना उपनेते मा. संजय कदम यांनी “शिवसेना शिंदे गट हा विकासाभिमुख विचारांचा पक्ष आहे. गुहागरसह संपूर्ण कोकणात आता पक्ष अधिक बळकट होईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचा आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो,” असे सांगून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, विधानसभा समन्वयक विपुल कदम, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, पांडुरंग पक्ष, अमरदीप परचुरे, निलेश मोरे, रोहन भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
गुहागरमधील नेत्रा ठाकूर यांचा शिंदे सेनेत शक्तीप्रदर्शनासह जाहीर प्रवेश, उबाठा सेनेला खिंडार
