रत्नागिरी : काळबादेवी येथील समुद्रात मासेमारी करताना बुडून बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सापडला. गजानन महादेव पेडणेकर (४५, रा. नेवरे काजीरभाटी) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी जयगड सागरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ही दुर्दैवी घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पेडणेकर हे काळबादेवी येथील जेटीजवळ आपल्या बोटीवर मासेमारी करत होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते समुद्रात पडले आणि बेपत्ता झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला.
अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह समुद्रात मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक कार्यवाही केली. मासेमारी करताना तोल जाऊन समुद्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.