रत्नागिरी: जिल्हा पोलिसांनी ‘मिशन शोध’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी करत एकाच दिवशी दोन बेपत्ता व्यक्तींना शोधून काढले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही व्यक्ती गेली अनेक वर्षे बेपत्ता होते आणि त्यांनी आपले गाव, नाव आणि मोबाईल नंबर बदलून मुंबईत वास्तव्य केले होते. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
जिल्ह्यातील हरवलेल्या आणि बेपत्ता व्यक्तींचा जलद गतीने शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी ‘मिशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, संगमेश्वर पोलीस ठाण्यातील दोन निष्क्रिय फाईल्स स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पुढील मंजुरीसाठी आल्या होत्या.
यामध्ये पहिले प्रकरण सन २०१८ पासून बेपत्ता असलेल्या सौ. माधुरी मंगेश तांबे (वय ३३, रा. माखजन, बनेवाडी, ता. संगमेश्वर) यांचे होते, तर दुसरे प्रकरण सन २०२२ पासून बेपत्ता असलेले श्री. योगेश भालचंद्र तांबे (वय ४५, रा. माखजन, बनेवाडी, ता. संगमेश्वर) यांचे होते. या दोन्ही प्रकरणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ‘मिशन शोध’ अंतर्गत गंभीर दखल घेतली आणि गोपनिय माहितीच्या आधारावर कसून तपास सुरू केला.
तपासादरम्यान, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी या पथकाने मुंबईत अधिक तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. दोन्ही बेपत्ता व्यक्ती आपले मूळ नाव-गाव आणि मोबाईल नंबर बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने पोलिसांनी अधिक वेगाने शोध घेत, अखेर नालासोपारा ईस्ट येथून या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींनी आपल्या गावी परत येण्यास नकार दिला. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार, त्यांना तुळींझ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
मिशन शोध’मुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे, तसेच पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध’; मुंबईतून घेतले ताब्यात!!
