मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व परीक्षा सुधारित तारखेनुसार शनिवार, २३ ऑगस्ट रोजी घेतल्या जाणार आहेत. परीक्षेच्या तारखेत बदल झाला असला तरी वेळेत व परीक्षा केंद्रामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मंगळवारी होणाऱ्या परीक्षांमध्ये पदव्युत्तर स्तरावरील संज्ञापन व पत्रकारिता सत्र ३, जनसंपर्क सत्र ३, टेलिव्हिजन स्टडीज सत्र ३, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र ३, फिल्म स्टडीज सत्र ३, एमपीएड. सत्र २, बीपीएड सत्र २, बीफार्म सत्र २, एमफार्म सत्र २, एमएड सत्र २, एमकॉम (ई-कॉमर्स) सत्र ४, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांना बसणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा लांबणीवर; तारखांमध्ये बदल, १९ ऑगस्टच्या परीक्षा २३ ऑगस्टला
