रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार नागरिकांनी मोठ्या उत्साहात ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या. प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधन बचत करण्यासाठी उचललेले हे पाऊल जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरू लागले होते. परंतु, आता याच ओला कंपनीच्या मनमानीमुळे हे सर्व ग्राहक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून म्हणजेच १ जुलैपासून शहरातील ‘ओला’चे एकमेव सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांची दुरुस्ती करणे शक्य होत नाहीये.
साधारणपणे दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च करून घेतलेल्या या गाड्या आता रस्त्याच्या कडेला धूळ खात उभ्या आहेत. सध्या नाचणे येथील बंद पडलेल्या सर्व्हिस सेंटरबाहेर जवळपास ४० ते ५० गाड्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभ्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्यामुळे तांत्रिक बिघाड झालेल्या गाड्या दुरुस्त करता येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या संदर्भात ग्राहक थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंपनीने मोठा गाजावाजा करून ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायला प्रवृत्त केले, पण आता त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी टाळत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.
या गंभीर समस्येकडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आता हे सर्व ग्राहक करत आहेत. प्रदूषणमुक्तीचे स्वप्न दाखवून ग्राहकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या कंपनीवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.






