राजापुरात सात खैराच्या झाडांची चोरी; चार नेपाळी मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

राजापूर: तालुक्यातील तेरवण सरफरेवाडी परिसरात असलेल्या एका खासगी सामाईक जमिनीतून विनापरवाना सात खैराची झाडे तोडून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात चार अनोळखी नेपाळी मजुरांविरुद्ध गुन्हासह गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही झाडे लबाडीच्या इराद्याने आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोडण्यात आल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष हरिश्चंद्र सरफरे (वय ६१, रा. सरफरेवाडी) यांच्या सामाईक जमिनीतील सर्वे नं. १५/०१ मध्ये ही झाडे होती. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विशाल विजय सरफरे यांच्याकडे कामाला असलेल्या चार नेपाळी मजुरांनी ही झाडे मालकाची कोणतीही परवानगी न घेता किंवा पूर्वकल्पना न देता मुळासकट खणून काढली आणि तोडून नेली.

वनपालांनी केलेल्या पंचनाम्यानुसार, चोरीला गेलेल्या या सात खैराच्या झाडांची एकूण किंमत ६ हजार ५७२ रुपये इतकी आहे.याप्रकरणी ७ मार्च २०२६ रोजी रात्री उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३(५) (गुन्हा क्रमांक ५१/२०२६) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या या नेपाळी मजुरांची नावे आणि पत्ते अद्याप समजू शकलेले नाहीत. पोलीस आता या संशयित आरोपींचा शोध घेत असून, या चोरीमागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *