चिपळूण: गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील ‘साफ यिस्ट’ या कंपनीने टँकरद्वारे थेट कामथे धरणात घातक सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ‘साफ यिस्ट’ कंपनीला उत्पादन बंद करण्याची (क्लोजर) नोटीस बजावली आहे.
याशिवाय, कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्याचे आदेश महावितरण आणि एमआयडीसीला देण्यात आल्याने कंपनीला टाळे लागण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी युवा सेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला होता.
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे धरणात दोन टँकरद्वारे मळीसदृश सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करून टँकर चालकांविरोधात गुन्हा दाखल केला, मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. ‘एमपीसीबी’च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
कंपनीने परवानगीपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला, बॉयलर इंधनात परस्पर बदल केला, आणि बॉयलरला लावलेला बॅग फिल्टरही नादुरुस्त अवस्थेत आढळला. यापूर्वीही कंपनीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही कंपनीने नियमांचे पालन न केल्याने आणि पर्यावरणाचे गंभीर नुकसान केल्याचा ठपका ठेवत ‘एमपीसीबी’ने पाणी प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९७४ नुसार ही कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषणकारी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई होईल असा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.