राजापूर: दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे राजापूर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, राजापूर यांना पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राजापूर अर्बन को-ऑप. बँक ही सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासन यांच्या ध्येयधोरणांची अभ्यासपूर्ण अंमलबजावणी करत आहे. बँकेचे संचालक मंडळ दूरदृष्टीने नियोजन करून प्रगती साधत असून, आर्थिक वर्ष 2023-24 मध्येही बँकेने आपली आर्थिक घोडदौड कायम राखली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने कोकण विभागातून ₹250 कोटी ते ₹500 कोटी ठेवी असलेल्या सहकारी बँकांमध्ये राजापूर अर्बन को-ऑप. बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.
हा पुरस्कार 23 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार असून, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि सारस्वत को-ऑप. बँक लि., मुंबई चे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या पुरस्काराच्या जाहीरातीनंतर राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. स्थानिक नागरिकांतही या सन्मानाबद्दल आनंदाचे वातावरण आहे.
राजापूर अर्बन बँकेला ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार
