संगमेश्वर: तालुक्यातील देवळे येथील मुख्य बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला आज शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पहाटेच्या दरम्यान सर्वसामसुम असताना ही आग लागल्याने कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र सकाळी सहा-साडेसहाच्या दरम्याने याच दुकानाच्या बाजूने मेघी येथील रमेश गोरुले हे जात असताना मेडिकल स्टोअरमधून धुराचे लोळ रस्त्यावर बाहेर येताना दिसले म्हणून त्यांनी बाजूचे दुकानदार किशोर पाथरे यांना हाक मारून उठवले व मेडिकलमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले व मेडिकलचे मालक जयेंद्र राजाराम चाळके यांना फोनद्वारे कळवण्यास सांगितले.
सदर आगीची कल्पना अमर चाळके, किरण चाळके यांना कळविण्यात आली त्यांनी त्वरित चाफवली येथून देवळे येथील मेडिकल स्टोर गाठले. जयेंद्र चाळके हे देवरुख येथे राहत असल्यामुळे दुकानाची चावी नसल्याने संदीप कानसरे यांनी कुलूप तोडून दुकानाचे शटर उघडले तोपर्यंत आगिने जोर धरला होता मात्र पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीची माहिती देवळेचे पोलीस पाटील विजीत साळवी यांनी साखरपा पोलीस स्टेशनला दिली तसेच ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयालाही समज दिली या आगीचा रीतसर पंचनामा संबंधित यंत्रणा करतील मात्र तरीही सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाल्याचे अंदाज आहे. मात्र ऐन दिवाळीच्या सणासुदीतून लागलेल्या आगीमुळे या दुकानाचे मालक जयेंद्र चाळके यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
देवळे येथील सुनंदा मेडिकलला भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान
