खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे गावाजवळ बुधवारी (१८ जून) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेड नगर परिषदेच्या कचरावाहू डंपरने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडच्या दिशेने येणाऱ्या नगर परिषदेच्या डंपरने भरणे येथील एका शाळेच्या बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक काही काळ थांबली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणाला गंभीर दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. तरीही, मुलांची वाहतूक करणाऱ्या बसला डंपरने धडक दिल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक धास्तावले असून, अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतुकीचे नियम पाळून आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.