GRAMIN SEARCH BANNER

पनवेल : रेल्वेच्या नियमांमुळे पदकवीर खेळाडूंना मनस्ताप

Gramin Varta
208 Views

पनवेल: रेल्वे मंत्रालयाने ठरवून दिलेल्या सामान वाहतुकीच्या नियमांचा फटका थेट देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या क्रीडापटूंनाच बसल्याची धक्कादायक घटना पनवेल रेल्वे स्थानकात घडली.

नामवंत पोल व्हॉल्टर्सपटू (बांबू उडीपटू) देवकुमार मीना व कुलदीप यादव यांना रेल्वेच्या नियमांमुळे तब्बल पाच तास मनस्ताप सहन करावा लागला असून, त्यांची नियोजित रेल्वेगाडीही सुटली.

प्रवासादरम्यान खेळासाठी अत्यावश्यक असलेला पोल प्रवासी डब्यातून नेता येणार नाही, असा आक्षेप रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला. पोल सामान डब्यात पाठवल्यास तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असल्याने खेळाडूंनी विनंती केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, पोल वाहतुकीसाठी अतिरिक्त शुल्क भरेपर्यंत त्यांना प्रवास करता आला नाही. अखेर पाच तासांनंतर शुल्क भरल्यानंतर पुढील रेल्वेने प्रवास शक्य झाला.

देवकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलची किंमत सुमारे दोन लाख रुपये असून, एका संचात सात पोल असतात. हे पोल तुटल्यास किंवा खराब झाल्यास खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसतो. रेल्वे किंवा विमान प्रवासात असे क्रीडा साहित्य सुरक्षितपणे नेण्यासाठी कोणतेही स्पष्ट सरकारी धोरण नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नियमांनुसार मोठ्या आकाराचे व वजनदार सामान सामान डब्यातूनच न्यावे लागते; मात्र अशा महागड्या व नाजूक क्रीडा साहित्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस हमी नाही.

या घटनेनंतर मीना व यादव यांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे केंद्र व राज्यातील क्रीडा धोरणकर्त्यांना साकडे घातले आहे. देशासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रवासादरम्यान अडचणीत टाकणारे धोरण तातडीने बदलावे, क्रीडा साहित्य वाहतुकीसाठी स्वतंत्र नियम, सवलती व सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

पनवेलमधील या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक स्तरावरील खेळाडूंनाही आजही मूलभूत सुविधांच्या अभावाला सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitor Counter

3389730
Share This Article