मुंबई : यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज असून दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. अंदमान समुद्र तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
तसेच शुक्रवारी हवामान विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, केरळ येथे मोसमी पावसाचे आगमन २६ मे रोजी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा वेळेपूर्वी पाऊस हजेरी लावणार असून त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम आहे तर काही जिल्ह्यांत वादळी पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्य महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदली गेली. त्यामुळे नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भातही सरासरीहून २ ते ३ अंश कमाल तापमानाची अधिक नोंद होत आहे. दरम्यान, शुक्रवारी विदर्भातील अकोला येथे ४५. ४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर वर्धा ४५.५, अमरावती ४५.६, नागपूर ४५ तर चंद्रपूर येथे ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या प्रदेशात किमान तापमानातही मागील काही दिवसांपासून वाढ नोंदली जात असून त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळीही उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ नोंदली जात होती शुक्रवारी मागील काही दिवसांच्या तुलनेत काही ठिकाणी १ ते २ अंशांची घट नोंदली गेली. दरम्यान, शुक्रवारी जळगाव येथे ४२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुणे ३६.२, सातारा, ३६.७, अहिल्यानगर ३९ आणि नाशिक येथे ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शनिवारी या प्रदेशातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम आहे. दरम्यान, पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
साधारणपणे मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यांनतर १० ते १२ दिवसात महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर दाखल होत असतो. मात्र, परिस्थिती अनुकूल असेल तर मात्र पाऊस वेगात दाखल होत असतो. यंदाही हवामानाची स्थिती अनुकूल राहिल्यास महाराष्ट्राच्या दक्षिण किनापट्टीवर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाने केरळ येथे मोसमी पाऊस २६ मे रोजी दाखल होईल, अशी शक्यता व्यक्त केली असली तरीही हे वेळापत्रक चार दिवस पुढे – मागे होऊ शकते असाही अंदाज आहे.
कोकण प्रदेशातील मुंबई, ठाणे, पालघर आणि राजगड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली तर सिंधुदुर्ग आणि रत्नगिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाची नोंद होत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत कोकण प्रदेशातील कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. मात्र, दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुंबईतील हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३४.४ तर कुलाबा केंद्रात ३४. २ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर दोन्ही केंद्रावर २८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान, शहरात शनिवारी ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा केरळमध्ये २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होणार





