GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांचे मुंबईत आंदोलन; राजू शेट्टींसह अनेक नेत्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात

Gramin Varta
9 Views

मुंबई : कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी अडविल्याने मोठा तणाव निर्माण झाला. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे मोर्चा नेण्याचा आंदोलकांचा निर्धार होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात होता; मात्र त्याआधीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. या कारवाईत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महादेव जानकर यांच्यासह अन्य नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

यंदा अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. फळबागांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली मदत अत्यंत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारकडून फक्त बावीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली, पण इतक्या मोठ्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत तोकडी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी मुंबईत येऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आंदोलक मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यास सुरुवात केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पोलिसांकडून दमदाटी तसेच धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला.

पोलिसांनी ताब्यात घेताना महादेव जानकर यांची उचलबांगडी केली, यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आम्ही न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिक्रिया जानकर यांनी दिली आहे.

ताब्यात घेतल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, दुपारी चार वाजता गिरगाव चौपाटीवर एकत्र जमल्यानंतर पोलिस अचानक आले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, आम्ही फक्त आंदोलन करण्यासाठी एकत्र आलो होतो, असे शेट्टी यांनी म्हटले. आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना नव्हता, असा त्यांचा दावा होता. पोलिसांनी उर्मटपणे भाषा वापरली, दमदाटी केली आणि धक्काबुक्की करून ताब्यात घेतले, असा आरोपही त्यांनी केला. कायदा शिकवण्याची गरज आम्हाला नाही, आम्ही केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे, परंतु प्रत्यक्षात पोलिस त्याच्या विरोधात वागत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, हा मोर्चा होणार म्हणजे होणार आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन आम्हाला करू दिले नाही तर सरकारला त्यांचे परिणाम भोगावे लागतील. आम्हाला अनेक नोटीस आल्या त्याचा फरक पडत नाही. पोलिसांपेक्षा आमची ताकद जास्त आहे. मोर्चा घोषित होऊन 15 दिवस झाले आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती रहायला हवे होते. शेट्टी पुढे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांसाठी तीन ते चार वेळा कोकणात येऊन गेले, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले नाही, तसेच शेतकऱ्यांचे निवेदनही स्वीकारले नाही, असा आरोप त्यांनी केला.

कोकणातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे एकत्र आला असूनही त्याच्या वेदना समजून घेतल्या गेल्या नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सरकारने भरीव मदत करावी, हीच शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून त्या मागणीसाठीच मुंबईत आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण घटनेमुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या आंबा आणि काजू बागायतदारांना तातडीने दिलासा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3389293
Share This Article