GRAMIN SEARCH BANNER

रेल्वे अधिकाऱ्यांकडून कुडाळ स्थानकाची पाहणी

कुडाळ: कोकण रेल्वेचे कुडाळ रेल्वे स्थानक बाहेरून चकचकीत दिसत असले तरी रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज कोकण रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक कुडाळ रेल्वे स्थानकाची पाहणी करायला आले असता, कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिकांनी कुडाळ रेल्वे स्थानकावरील समस्यांचा पाढाच वाचला.

लांब पल्याच्या रेल्वेसह बांद्रा मडगाव एक्स्प्रेसला कुडाळ स्थानकावर थांबा द्या. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्मला कव्हर शेड घाला. स्थानकावरून वायफाय सेवा व लाईट सुरू ठेवा आदी मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर केला जाईल, अशी ग्वाही उपस्थित कमिटीने दिली. दरम्यान, रेल्वे फलाटाला लागून असलेल्या धोकादायक दरडीकडेसुद्धा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असून याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोकण रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर मधुकर मातोंडकर, सेक्शन इंजिनियर जी.पी प्रकाश, एरिया सुपरवायझर विजय सामंत, इलेक्ट्रिकल इंजिनियर चिन्मय भंडारे यांनी कुडाळ स्थानकाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. कुडाळ रेल्वे स्थानकावर वेंगुर्ले व मालवण सह कुडाळ तालुक्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर येतात, कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती स्थानक आहे. याकडे नंदन वेगुर्लेकर यांनी प्राधान्याने लक्ष वेधत कुडाळ स्थानावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, वेटिंग रूम, शौचालय व प्रसाधनगृह यांची चांगली व्यवस्था करा, वायफाय सेवा उपलब्ध करा, रात्रीच्या वेळी विजेचे दिवे सुरू ठेवा, लिफ्टची व्यवस्था करा याकडे लक्ष वेधले. रेल्वे प्रवासी हे तिकीट काढून येतात,त्यामुळे त्यांना अत्यावश्यक सेवा देणे क्रमप्राप्त असल्याचे वेगुर्लेकर यांनी सांगितले. कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकावर अमृतसर, पोरबंदर योगनगरी, केरळ, संपर्क क्रांती या गाड्यांना रत्नागिरी ते मडगाव पर्यंत कुठेही थांबा नाही, त्यामुळे त्या गाड्यांना कुडाळ येथे थांबा द्या. मेगलोर एक्सप्रेस व बांद्रा मडगाव एक्सप्रेसला कुडाळमध्ये थांबा द्या अशी विनंती करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या बाहेर पार्किंगच्या जागेमध्ये रिक्षा व्यवस्थित पार्क न केल्यामुळे खाजगी वाहनांना पार्क करताना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे रेल्वे स्थानकावरील पार्किंग जागेत रिक्षांचे पार्किंग नियोजनबद्ध करण्यात यावे. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूला दरड सदृश्य भाग असून पावसाळी मोसमात तो प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे, याठिकाणी संरक्षक भिंत बांधली जाईल, असे यावेळी जी.पी.प्रकाश यांनी सांगितले. तसेच स्थानकावरील शेड नादुरुस्त झालेल्या असून त्याची दुरुस्ती वेळेत करण्यात यावी याकडे उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी ही सर्व कामे प्राधान्याने केली जातील अशी ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. कोकण रेल्वेच्या कोणत्याही दिवसाचे तिकीट प्रवाशांना सहज उपलब्ध होत नाही मात्र तेच तिकीट एजंटांना कसे उपलब्ध होते? याकडे उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वे स्टेशन वरून रेल्वे निवासस्थानाच्या बाजूकडे रेल्वे ट्रॅक खालून जाणाऱ्या रस्त्याची उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहेत्या. मुळे त्या रस्त्याची प्राधान्याने दुरुस्ती करा अशी मागणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जातो, याकडे नगरसेविका आफरीन करोल यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

Total Visitor Counter

2455556
Share This Article