दापोली: लाडघर समुद्र किनाऱ्यावर बिबट्यासारख्या रंगाचा दुर्मीळ ‘रेचन मासा’ सपडल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक रविराज हेदुकर यांना हा मासा समुद्र किनाऱ्यावरील खडकाळ भागात आढळून आला.
बिबट्यासारखे चट्टे असलेल्या या माशाला स्थानिक पातळीवर वाघोळ, वाघमासा, गवारे, गवाळ किंवा गवळा अशा विविध नावांनी ओळखले जाते. याचा देह रचनेने लांबट आणि अजगरासारखा असतो, तर राहण्याचे ठिकाण हे समुद्रातील उथळ व खडकाळ भाग असतो. हा मासा लहान मासे व कोळंबी यांचे भक्षण करतो. खवय्यांमध्ये याला चांगली मागणी असून, हॉटेल्समध्ये विशेषतः याचा वापर केला जातो. शिवाय, आकर्षक रंगसंगतीमुळे तो फिशटॅंकमध्ये सजावटीसाठीही वापरला जातो.
त्यामुळे बाजारात याला चांगली किंमत मिळते. दुर्मीळ व वेगळ्या प्रकारचा मासा आढळल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, निसर्ग संवर्धनाचा आदर्श ठेवत रविराज हेदुकर यांनी हा मासा पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडला.
या माशाला लेस्ड मोराय ईल (शास्त्रीय नाव: जिमनोथोरॅक्स फॅव्हॅजिनियस) किंवा याला लेपर्ड मोराय, लेपर्ड मोराय ईल, टेसेलेट मोराय किंवा हनीकॉम्ब मोराय असेही म्हणतात. ही मुरेनिडे कुटुंबातील सागरी माशांची एक प्रजाती आहे. त्यांची लांबी ६ फुटांपर्यंत वाढू शकते. हा निशाचर जलचर असून, रात्री अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतो.
दापोली : लाडघर समुद्रात आढळला बिबट्याच्या रंगाचा ‘मासा’
