लांजा: लांजा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका शाळेत अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच शाळेतील तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पालकवर्ग आणि स्थानिक प्रशासन या घटनेची गांभीर्याने दखल घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि अत्याचार करणारे हे अल्पवयीन आहेत. शाळेतच ही संतापजनक घटना घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मात्र अत्याचार करणारे हे अल्पवयीन असल्याने कारवाई करण्यात अडचण येत आहे. तरी पोलिसांची कारवाई सुरू आहे.
शिकत असणाऱ्या शाळेतच या तीन अल्पवयीन मुलांनी मुलीवर अत्याचार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करणार की अजून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे संपूर्ण प्रकरण काही राजकीय लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
या घटनेमुळे लांजा तालुक्यात बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काटेकोर आणि कडक उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकवर्गाकडून तीव्रपणे केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून पीडितेला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.