पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
10 Views

25 हजार सुरक्षित क्लासरूम उभारणार

मुंबई: महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  घेतला.

या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत एक कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणार्‍या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते, त्यांनीही अनेक उपयुक्त सूचना या बैठकीत केल्या.

वर्षा निवासस्थानी आज विशेषत्वाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरेल.

राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Total Visitors :
4697519
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *