रत्नागिरी : तालुक्यातील नाणिज गावात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसासह वाऱ्याने कहर केला. या नैसर्गिक आपत्तेमुळे रत्नू सूर्याजी रेवाळे यांच्या घरावर आंब्याचे एक जुने व मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैवच म्हणावे लागेल; मात्र घराच्या छताचे आणि संरचनेचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी (१ जुलै) सायंकाळी साधारण ६ वाजण्याच्या सुमारास नाणिज परिसरात अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याच्या झटक्याने रेवाळे यांच्या घराजवळील जुने आंब्याचे झाड मुळासकट उन्मळून थेट त्यांच्या घरावर कोसळले. त्यामुळे पडवीचे मोठे नुकसान झाले. पत्रे तुटून पडले आहेत. सुदैवाने या ठिकाणी कोणी नसल्यामुळे अनर्थ टळला.
या झाडामुळे घराचे पत्रे वाकले, छप्पर फाटले, आणि घरातील काही सामानही खराब झाले. त्या वेळी घरात रेवाळे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते; मात्र झाड कोसळले तेव्हा कोणालाही थेट इजा झाली नाही. ग्रामस्थांच्या तत्काळ मदतीने झाड बाजूला काढण्यात आले आणि घरातील लोक सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ एकत्र येत झाड हटवण्याचे काम हाती घेतले. पोलीस पाटील नितीन कांबळे, सरपंच विनायक शिवगण यांनी भेट देऊन पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
घर गेले, पण प्राण वाचले…
“घराचं नुकसान झालं, पण आम्ही सारे सुखरूप आहोत, हीच सध्याची समाधानाची गोष्ट आहे. देवाची कृपा होती म्हणावी लागेल,” असे रत्नू रेवाळे यांनी सांगितले.
नाणिज येथे घरावर झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
