GRAMIN SEARCH BANNER

नावडी येथे वैभव मुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बॅनर-केक’ला छेद देत विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम!

Gramin Varta
88 Views

संगमेश्वर/दिनेश अंब्रे:  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नावडी विभाग प्रमुख श्री. वैभव राजाराम मुरकर यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या मित्रमंडळींनी ‘बॅनरबाजी’ आणि ‘केक कापणे’ या पारंपरिक पद्धतीला छेद देत एक अत्यंत स्तुत्य सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविला.

वाढदिवसाचे औचित्य साधून, वैभव मुरकर यांच्या मित्रपरिवाराने संगमेश्वर तालुका उत्तर विभाग आणि उद्योजन शिक्षण प्रसारक संघ (मुंबई) संचलित बोर्डिंग संगमेश्वर येथील वसतिगृहात जाऊन तेथील २५ गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व खाऊ वाटपाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास मदत झाली.

यावेळी संस्थेचे तसेच पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यात मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष मनोहर पवार, खजिनदार विजय गमरे, ग्रामीण अध्यक्ष रोहित तांबे, सरचिटणीस प्रशांत जाधव, उपाध्यक्ष संगम पवार यांचा समावेश होता.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, शाखाप्रमुख जनार्दन रहाटे आणि शाखा प्रमुख सुरज सुर्वे यांच्यासह अन्य शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशांत पवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २5 विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू म्हणून वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर यांनी त्यांच्या भाषणात, “बॅनरबाजी आणि केक कापण्याच्या पद्धतीत छेद देऊन वैभव मुरकर यांनी केलेला हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम अत्यंत प्रशंसास्पद आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनी मुरकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, प्रशांत जाधव आणि विद्यार्थी वर्गाने देखील सत्कारमूर्ती वैभव मुरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैभव मुरकर यांनी आपल्या मनोगतात, गेली अनेक वर्षे संगमेश्वरमध्ये चालू असलेल्या वसतिगृहाचे कामकाज, तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून येथे शिक्षण आणि संस्कार घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थी वर्गाच्या सुखसोयींची प्रशंसा केली. वसतिगृह संस्थेचे अधीक्षक, पदाधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे त्यांनी या प्रशंसात्मक कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले.संस्थेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी देखील वैभव मुरकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लाडक्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त तालुका आणि जिल्हा स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून श्री. वैभवजी मुरकर यांना शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3199192
Share This Article