GRAMIN SEARCH BANNER

लांजा शहरात मंगळवारपासून फिरते सुलभ शौचालय; समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
56 Views

लांजा : शहरात फिरते सुलभ शौचालय तातडीने उभारण्याची मागणी सातत्याने करूनही कारवाई न झाल्याने समन्वय समितीने मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांची भेट घेत स्मरणपत्र दिले. या पाठपुराव्यानंतर अखेर मंगळवार, १६ डिसेंबरपासून शहरात फिरते सुलभ शौचालय उभारण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे.

लांजा शहरातील कोत्रे टी हाऊसजवळील सुलभ शौचालय महामार्ग रुंदीकरणात अधिग्रहीत झाल्याने ते तोडण्यात आले. मात्र, शौचालय तोडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत समन्वय समितीच्यावतीने नगरपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले होते.

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नगरपंचायत कार्यालयाकडे उपलब्ध असलेले फिरते सुलभ शौचालय त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ९ डिसेंबर रोजी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने १५ डिसेंबर रोजी समन्वय समितीने पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत स्मरणपत्र दिले.

या भेटीनंतर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी मंगळवारपासून लांजा शहरात फिरते सुलभ शौचालय उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले असून त्यानुसार तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्मरणपत्र देताना समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांच्यासह निरंजन देशमुख, शेखर स्वामी आणि मंदार भिंगार्डे उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366867
Share This Article