GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: श्री करंजेश्वरी देवीच्या नूतन मुखवट्याची भव्य शोभायात्रा

Gramin Varta
48 Views

चिपळूण (प्रतिनिधी): कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, चिपळूणचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करंजेश्वरी देवीचा ९०० ग्रॅम सोन्याचा देखणा मुखवटा लोकवर्गणीतून साकारण्यात आला आहे. या सुवर्ण मुखवट्याची चिपळूण शहरातून अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘आई करंजेश्वरी प्रसन्न’ आणि ‘विठू नामाच्या’ जयघोषाने संपूर्ण चिपळूण नगरी दुमदुमून गेली होती.

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीने देवीच्या मुखवट्यासाठी भाविकांना सुवर्ण दानाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो भाविकांनी दिलेल्या दानातून हा भव्य मुखवटा तयार झाला आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री भैरी मंदिरापासून गोवळकोट येथील करंजेश्वरी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील महिला व पुरुषांचा सहभाग लक्षणीय होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर तरुण वर्ग थिरकत होता, तर वारकरी संप्रदायाने आपल्या भजनांनी वातावरणात भक्तिरस निर्माण केला. या शोभायात्रेत चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. हा सोहळा पाहण्यासाठी चिपळूणकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरात जणू भक्तीचा महापूर लोटला असल्याचे चित्र दिसत होते.

Total Visitor Counter

3370295
Share This Article