GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात गोवंश तस्करीसाठी गुंगीचे औषध देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Gramin Varta
491 Views

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) परिसरात गोवंश तस्करीसाठी गुंगीचे औषध देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी २५ रोजी पहाटे सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. काळ्या रंगाची एक्सवायएलओ चारचाकी गाडी परिसरात संशयास्पदरीत्या घिरट्या घालत होती.

या गाडीत तीन तरुण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संबंधितांनी परिसरातील गाईंना गुंगीचे औषध दिल्यानंतर त्या बेशुद्धावस्थेत गेल्यावर गाडीत भरून नेण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्याचवेळी गाईंनी गाडीतून उडी मारल्याने संशय अधिक बळावला. हा प्रकार परशुराम येथील रहिवासी सचिन पावसकर यांच्या निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ धाडस दाखवत हातात मिळेल त्या वस्तूने संबंधित एक्सवायएलओ गाडीची मागील काच फोडली. आपल्याला कोणी पाहिले असल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने गाडी भरधाव वेगाने लोटे एमआयडीसीच्या दिशेने पळवून नेली. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे वाहन क्रमांक नोंदवता आला नाही. या घटनेत चार गाई व एक बैल असा एकूण पाच जनावरांचा समावेश असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वेळेवर स्थानिकांनी धाडस दाखवल्यामुळे गोवंश तस्करीचा पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

Total Visitor Counter

3367457
Share This Article