सुधारणा न झाल्यास उपोषणाचा इशारा
संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडीभागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी गुरुवारी थेट संगमेश्वर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
फुनगुस गाव आणि परिसरात वीज पुरवठ्यात वारंवार बिघाड होत असून, एकदा वीज गेल्यावर किमान २ ते ४ तास आणि कधीकधी तर दोन-दोन दिवस वीज नसते. याबाबत कार्यालयात विचारणा केल्यास ‘वरुण सप्लाय गेलाय’ असे ठरविक उत्तर दिले जाते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. एका लाईनमध्ये बिघाड झाल्यास अनेक घरे आणि दुकाने दोन-दोन दिवस अंधारात राहतात, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते.
यापूर्वी अनेकदा ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी महावितरणकडे या समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, उलट वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याने येथील युवा कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष लांजेकर, युवा कार्यकर्ते साहिम खान, परवेज नाईक, अफाक बोदले, ज्येष्ठ शिवसैनिक इकबाल पटेल यांच्यासह ग्रामस्थांनी गुरुवारी संगमेश्वर येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि सहायक अभियंता (शाखा कुंरधुडा संगमेश्वर) नितीन माळी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी फुणगुस गाव आणि परिसरातील विजेच्या समस्यांचा पाढा वाचला आणि लेखी निवेदनही दिले. अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पुढील महिनाभरात सर्व समस्या निकाली निघून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.