सावर्डे : रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे नायशी उपकेंद्रात रुग्णांना वितरित करण्यात आलेल्या डागयुक्त पॅरासिटोमोल टॅबलेट प्रकरणी अखेर कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे औषध निरीक्षक सोपान वाडे यांनी बुधवारी नायशी उपकेंद्राला भेट देऊन औषध साठ्याची पाहणी केली.
या वेळी वहाळ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीरजा यादव यांच्या ताब्यात असलेला बुरशीयुक्त साठा सील करून तो तपासणीसाठी मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्याचबरोबर औषध निरीक्षकांनी उपकेंद्र व आरोग्य केंद्रातील औषध विभागास रुग्णांना औषध देण्यापूर्वी तपासणी करून खात्री करण्याच्या सूचना दिल्या.
नायशी उपकेंद्रातील हा संशयित साठा बुधवारी दुपारी ताब्यात घेण्यात आला होता. गुरुवारी सील करून प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात आलेला सर्व पॅरासिटोमोल साठा सील करण्यात आल्याची माहिती सोपान वाडे यांनी दिली.
औषध निरीक्षकांनी प्राथमिक तपासणीत सांगितले की, टॅबलेटवर काळे डाग आढळले तरी टॅबलेट नरम झालेल्या नाहीत. हे डाग फूड ऑइलमुळे असू शकतात, मात्र रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जात आहे.
या घटनेवर नायशी गावचे उपसरपंच संदीप घाग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “शासन स्तरावर उपलब्ध होणाऱ्या औषधांमध्ये डाग किंवा बुरशी निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.
नायशी उपकेंद्रातील औषधांचा साठा सील; तपासणीसाठी मुंबई प्रयोगशाळेत पाठवला
