मुंबई : गणेशोत्सवात भाविकांना मुंबई ते कोकण असा प्रवास अतिजलद, केवळ सहा तासात करता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते विजयदुर्ग अशी रो रो (रोल ऑन-रोल ऑफ सेवा) सेवा सुरु करण्यात येईल असे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली होती.मात्र आता ही घोषणा कोरडी ठरणार आहे.
बुधवारपासून गणेशोत्सवास सुरुवात होणार असल्याने आतापर्यंत रो रो सेवा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही रो रो सेवा सुरु झाली नसून येत्या काही दिवसातही ही सेवा सुरु होण्याची चिन्हे नाहीत. कारण मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय नौकायन महासंचालनालयाकडून परवानगी न मिळाल्याने सेवा सुरु करणे महाराष्ट्र सागरी मंडळास शक्य झाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान सहा तासात कोकणात पोहचण्याचे स्वप्न भंगले आहे.
मुंबईतून मोठ्या संख्येने भाविक गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. त्यामुळे रस्ते मार्गे, रेल्वेने आणि एसटीने जाणार्यांची संख्या मोठी असते आणि प्रवाशांना गर्दीचा, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते मालवण प्रवासासाठी बराच वेळ खर्ची करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग, मालवण अशी रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सेवेनुसार विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रो रो जेट्टीत रुपांतर करण्याचे काम मागील काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरु होते. हे काम २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करत २१ ऑगस्टपासून रो रो सेवेची चाचणी (ट्रायल ) सुरु करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. त्यानुसार विजयदुर्ग रो रो जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. तर रो रोच्या दृष्टीने इतर पायाभूत सुविधाही साकारण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असून आतपर्यंत मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात पोहचले आहेत. आज आणि उद्या उर्वरित भाविक कोकणात पोहचतील. पण अशावेळी रो रोद्वारे मुंबई ते मालवण सहा तासात प्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र भंगले आहे. कारण सागरी मंडळाची रो रो सेवा अद्यापही सुरु झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसातही ही सेवा सुरु होण्याची शक्यता नाही.
अद्याप परवानगीच नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय नौकायन महासंचलनालयाकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने गणेशोत्सवाच्या आधी सेवा सुरु करण्याचा मुहुर्त चुकला आहे. याविषयी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांना विचारले असता त्यांनी रो रो सेवा सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल असे लोकसत्ताला सांगितले. मात्र गणेशोत्सवाच्या दोन-तीन दिवस आधी ही सेवा सुरु होणार होती, मात्र अद्याप सेवा सुरु झालेली नाही याबाबत विचारले असता त्यांनी अधिक बोलणे टाळले.
गणेशोत्सवात सहा तासात कोकणात पोहचण्याचे स्वप्न भंगले, मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेचा मुहूर्त हुकला
