एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेचा मुलीकडे सुपूर्द; राजापूर पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
राजापूर: राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पाचल बाजारपेठ परिसरात आज, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी एक अनोळखी महिला एकटी फिरताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. सदर महिलेस विचारपूस केल्यानंतर तिने दिलेली माहिती आणि तिची असहाय्य अवस्था पाहता, राजापूर पोलिसांनी तत्परतेने मानवी आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवत मोठी मदत केली. या कामगिरीबद्दल परिसरामध्ये पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.
पाचल बाजारपेठेत ही महिला एकटीच, काहीशी भांबावलेल्या अवस्थेत फिरत होती. परिसरातील जागरूक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर राजापूर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सदर महिलेस नाव-गाव विचारले असता, तिने आपले नाव सुमती केशव मोरे आणि पत्ता तळवडे-आंबेवाडी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्या घरी एकट्याच राहत असल्याचे आणि त्यांच्यासोबत कोणीही नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पुढील पाऊल उचलले. चौकशीअंती त्यांची मुलगी सुरेखा सुरेश राजपकर या सौंदळ येथे राहत असल्याची माहिती मिळाली. कोणताही विलंब न करता, पोलिसांनी त्यांच्या मुलीशी संपर्क साधून त्यांना पाचल येथे बोलावून घेतले.
राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांनी ही संपूर्ण कार्यवाही अत्यंत संवेदनशीलपणे पार पाडली. महिलेची मुलगी पाचल येथे पोहोचल्यानंतर, पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुमती मोरे यांना त्यांच्या मुलीच्या सुरक्षित ताब्यात सुपूर्द केले.
मोठ्या बाजारपेठेत एकटी आणि अनोळखी महिला आढळल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे एक वृद्ध महिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकली. या मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामगिरीबद्दल पाचल परिसरासह राजापूर तालुक्यात पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.