रत्नागिरी : शहरातील मांडवी भुते नाका येथे दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताला न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अंकुश सूर्यकांत मांडवकर (२९, रा. भुते नाका, रत्नागिरी) असे जामीन मंजूर झालेल्या संशयिताचे नाव आहे.
ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. अंकुश मांडवकर हा कोयता घेऊन भुते नाका परिसरात रस्त्यावर आला आणि त्याने दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी अंकुशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
या हल्ल्यात अरमान इनामदार (२९, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हा तरुण जखमी झाला होता. आरोपीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गेल्या दीड महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
आरोपीच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, जखमी व आरोपी यांची पूर्वी कोणतीही ओळख नव्हती तसेच त्यांच्यात कोणतेही वैर नव्हते. त्यामुळे आरोपीकडून खून करण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत नाही. तपास जवळपास पूर्ण झाला असून आरोपीला अधिक काळ कोठडीत ठेवण्याचे कारण नाही. जामीन मंजूर झाल्यास न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन केले जाईल, असेही सांगण्यात आले.
यावर सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असून घटनास्थळावरूनच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला मद्यपानाचे व्यसन असून तो भविष्यात अधिक गंभीर गुन्हा करू शकतो. तसेच तपास अद्याप सुरू असल्याने पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी निकाल देताना नमूद केले की, सादर करण्यात आलेल्या तपास कागदपत्रांवरून तपास जवळजवळ पूर्ण झाल्याचे दिसते. आरोपीला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून तो दीड महिन्यांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहे. कथित गुन्हा मद्यप्राशनाच्या प्रभावाखाली झाल्याचे दिसते तसेच आरोपी व तक्रारदार यांची ओळख नाही.
या सर्व बाबी, तपासाची स्थिती आणि कोठडीतील कालावधी लक्षात घेता, आरोपीस कठोर अटींसह नियमित जामीन मंजूर करण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने नमूद करत ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.






