सह्याद्रीकला महाविद्यालयाच्या ३२व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन
संगमेश्वर : सह्याद्री कला महाविद्यालयाची स्थापना करताना शिक्षण महर्षी निकम साहेबांकडे मोठी दूर दृष्टी होती. कोकणच्या ग्रामीण भागातील कलाकारांना यामुळे कला शिक्षणाच्या प्रवाहात येता आले. सह्याद्री शिक्षण संस्थेत अनेक मान्यवर येत असतात या सर्वांना आम्ही कला महाविद्यालय आणि गॅलरी दाखवतो. येथील कलाकृती पाहून येणारे पाहुणे देखील थक्क होतात. येथे शिक्षण घेऊन असंख्य कलाकार आज यशस्वी झाले आहेत. याचे श्रेय ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशीर्के आणि येथील प्राध्यापकांचे आहे. कला क्षेत्रात नवंनवीन आव्हानं येत आहेत, विद्यार्थ्यांनी याचा सामना करायला सर्व कौशल्य आत्मसात करायला हवीत. कलाकार कलाकृतीत सर्वस्व पणाला लावतो त्यावेळी कलाकृती बोलकी होते, असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष आम. शेखर निकम यांनी केलं.
कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कला महाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या ३२ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ १५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आम. निकम हे बोलत होते. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान मा. आमदार शेखर गोविंदराव निकम (चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ) यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जयंत कदम (चित्रकार, सातारा), रोहन पवार (शिल्पकार, मुंबई), प्रकाश अर्जुन राजशिर्के (चेअरमन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे), सौ. पूजा निकम ( माजी सभापती ),सौ. युगंधरा राजेशिर्के, अनिरुद्ध निकम, बत्तासे सर, भोसले सर, लकेश्री सर, वाघचौरे सर, चित्रकार विष्णू परीट , भुरण मॅडम, सावर्डेकर सर, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, प्रा. धनंजय दळवी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य माणिक यादव यांनी प्रास्ताविकात कला महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
या कला प्रदर्शनाच्या औचित्याने दरवर्षी दिला जाणारा शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार यावर्षी प्रसाद सत्यवान राणे यांना प्रदान करून गौरविण्यात आले. राणे हे एक अनुभवी कला शिक्षक असून त्यांनी एस.एस.सी., ए.टी.डी., जी.डी. आर्ट व ए.एम. असे कला शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे सहाय्यक शिक्षक (कलाशिक्षक) म्हणून कार्यरत आहेत. कला क्षेत्रातील त्यांचे योगदान व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हा गौरव करण्यात आला. या प्रदर्शन प्रसंगी बोलताना सत्कारमुर्ती प्रसाद राणे म्हणाले की, कोकणातील भव्य अशा कला महाविद्यालयाकडून माझा सन्मान होणं हे माझं भाग्य. आज कला शिक्षक काहीसा दुर्लक्षित होवू लागला आहे. मात्र कला आणि क्रीडा शिक्षक हे शाळेचा आरसा असतात. शासनाने या दोन्ही शिक्षकांना सन्मानाने नियुक्त करावं असं आवाहन राणे यांनी केले.
वार्षिक कला प्रदर्शनाचे परीक्षक शिल्पकार रोहन पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा मात्र स्वतःची स्वतंत्र शैली तयार करुन आपली ओळख निर्माण करावी. वार्षिक कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम कलाकृती साकारल्या आहेत. यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता असते. कलाकारांनी आपला हात सतत कामात व्यस्त ठेवावा, असे आवाहन पवार यांनी केले. कला महाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशीर्के म्हणाले की, निकम साहेबांनी अत्यंत दूरदृष्टीने या कला महाविद्यालयाची स्थापना केली. आजवर येथे असंख्य कलाकार घडले. आजवर येथे घडलेल्या आणि यशस्वी झालेल्या कलाकारांनी सह्याद्री कला महाविद्यालयाला कधीही विसरू नये असे आवाहन राजेशीर्के यांनी केले .
या कला प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकला, शिल्पकला, रेखांकन, रंगकाम, प्रतिमानबंध अशा विविध माध्यमांतील कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीपकुमार देडगे यांनी केले.
कलाकार कलाकृतीत सर्वस्व पणाला लावतो त्यावेळी कलाकृती बोलकी होते : आम. शेखर निकम






